Monday 22 March 2021

सुखदेव : ( १५ मे १९०७ –२३ मार्च १९३१)

सुखदेव : ( १५ मे १९०७ –२३ मार्च १९३१). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक. मूळ नाव सुखदेव रामलाल थापर. जन्म लुधियानातील चौरा बाजार येथे. या ठिकाणाला नऊ घर असेही संबोधतात. आईचे नाव शल्ली देवी असे होते. त्यांनी पंजाबमध्ये क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावले. यामुळे ब्रिटिश सरकारविरुद्ध सुखदेव अशी स्थिती निर्माण झाली.

सुखदेवांनी ल्यालपूर (पंजाब) येथे १९२६ पासून तरुणांना एकत्र जमविण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘ हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ‘च्या वाङ्‌मयाचा तरुणांत प्रचार केला. दिल्ली येथे १९२८ मध्ये सर्व क्रांतिनेत्यांची गुप्त परिषद भरली. तीत ‘ हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ’ नावाची नवीन देशव्यापी संघटना उभारण्याचे ठरले. केंद्रीय समितीत सुखदेव व भगतसिंग हे पंजाबतर्फे होते. यात शिववमी, चंद्रशेखर आझाद आणि कुंदनलाल हे विद्यार्थीही होते. संघटनेच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार बाँबची कवचे बनविण्यासाठी सुखदेव लाहोरला गेले. नंतर तयार बाँबची चाचणी झांशी येथे घेतली. लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधील अभ्यासिकेत सुखदेव यांनी हिंदुस्थानचा इतिहास, रशियन राज्यक्रांती या विषयांचा चिकित्सकपणे अभ्यास केला. जागतिक पातळीवरील क्रांतिकारक साहित्याचे विविध दृष्टिकोण त्यांनी अभ्यासले. कॉम्रेड रामचंद्र, भगतसिंग आणि भगवतीचरण व्होरा यांच्या मदतीने त्यांनी ‘नौजवान भारत सभा’ ही संघटना लाहोर येथे स्थापन केली. या संघटनेचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे ठरविण्यात आले : (१) स्वातंत्र्यलढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे. (२) तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे. (३) जातियतेविरुद्घ लढणे व (४) अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे. या कार्यक्रमांत त्यांनी सक्रिय भाग घेतला. १९२९ मध्ये लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल उपोषण केले.

Click here more information

https://vishwakosh.marathi.gov.in/25933/ 

No comments:

Post a Comment