Thursday 19 August 2021

धरणे व बंधारे

धरणे व बंधारे : नदीच्या अथवा कुठल्याही जलप्रवाहाच्या पात्रात पाण्याचा प्रवाह अडवून त्याचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यासाठी बांधण्यात येणारी भिंत म्हणजे धरण होय. धरण हे योग्य स्थळी जलप्रवाहाच्या खोऱ्याच्या एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत बांधलेली एक विस्तृत भिंतच असते. पुष्कळ वेळा धरणावरून वाहतूक करण्यासाठी योग्य रुंदीचा रस्ताही ठेवतात. ही भिंत जर कमी उंचीची असेल (आणि तीवर पाण्याचा साठा करण्याकरिता लोखंडी दारे बसविलेली असतील), तर त्याला बंधारा म्हणतात. अनेक वेळा लहान मोठ्या नाल्यामधून वाहत्या पाण्याची पातळी उंचावणे आणि ते वळविणे यांकरिता जलप्रवाहाच्या पात्रात जी लहान भिंत बांधतात तिला लघुबंधारा म्हणतात. लघुबंधाऱ्याला लोखंडी दारांची आवश्यकता नसते. तसेच यामुळे होणारा पाण्याचा साठा अतिशय कमी प्रमाणात असतो. पावसाळ्यात पूराच्या वेळी संपूर्ण बंधाऱ्यावरून तसेच लघुबंधाऱ्यावरूनही पाणी वाहते. या उलट धरणाच्या बांधणीमध्ये धरणाच्या एकूण लांबीपैकी फक्त काही विवक्षित लांबीवरूनच पाणी वाहू देण्याची मुभा असते धरणाचा बाकीचा भाग हा जलाशयाच्या पाण्याच्या कमाल पातळीच्यावर काही उंचीपर्यंत बांधलेला असतो.

इतिहास : धरणांचा इतिहास फार पुरातन आहे. प्राचीन काळी इजिप्त, मेसोपोटेमिया, चीन आणि भारत या देशात कोरड्या ऋतूंत शेतीसाठी व माणसांच्या उपयोगासाठी आणि पुरांपासून संरक्षण करण्याकरिता अनेक धरणे बांधली गेली होती.

नाईल नदीवरील कोशेश येथे इ. स. पू. २९०० च्या सुमारास बांधलेले १५ मी. उंचीचे धरण हे सर्वांत प्राचीन धरण मानण्यात येते. हे धरण मीनीझ या राजाच्या मेंफिस येथील राजधानीला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधले होते. ईजिप्तमधील इ. स. पू. २७०० च्या सुमारास नाईल नदीवर बांधलेले साद-एल्-काफारा नावाचे दगडी धरणही जगातील एक जुने म्हणून मानण्यात येते व या धरणाचे अवशेष अद्यापही पहावयास मिळतात. ते धरण कैरोपासून सु. ३० किमी. अंतरावर होते आणि त्याची लांबी १०६ मी. व उंची १५ मी. होती. हे धरण बांधल्यानंतर थोड्याच काळात सांडव्याच्या अभावी पुरामुळे पडले व त्यानंतर अनेक शतके ईजिप्तमधील लोकांनी दगडाची धरणे बांधली नाहीत. अद्यापही उपयोगात असलेले सर्वांत जुने धरण सिरियातील ओराँटीझ नदीवरील असून ते ६ मी. उंचीचे व दगडी भरावाचे आहे.

Clicklink more information

https://vishwakosh.marathi.gov.in/19218/ 

No comments:

Post a Comment