आत्मचरित्र : आपल्या जीवनविषयक अनुभवांचे व तदनुषंगाने आपल्या व्यक्तिमत्त्वाचे स्वतः लेखकाने लेखनरूपाने घडविलेले दर्शन म्हणजे आत्मचरित्र होय. आत्मचरित्राप्रमाणे इतरही अनेक लेखनप्रकारांनी असे दर्शन घडविता येते. त्यांत खाजगी पत्रव्यवहार, मुलाखती, दैनंदिनी, रोजनामे (जर्नल्स), ख्रिस्ती धर्मकल्पनेनुसार केलेली पापनिवेदने, स्मृतिचित्रे (रेमिनिसन्सेस) व संस्मरणिका (मेम्वार्स) यांसारखे आत्मचरित्रपर लेखनप्रकार अंतर्भूत होतात.
आत्माविष्काराची मानवी प्रवृत्ती नैसर्गिक व सार्वत्रिक असल्याने आत्मचरित्रपर लेखन सर्वच भाषांत आढळून येते. एक साहित्यप्रकार म्हणून ज्यास आत्मचरित्र म्हटले जाते, ते आणि उपर्युक्त आत्मचरित्रपर लेखनप्रकार यांत फरक आहे. आत्मचरित्रामागे आत्माविष्काराची प्रेरणा, आत्मजीवनाच्या अर्थपूर्णतेची अभिज्ञता, स्वानुभवांतील निवडीची दृष्टी आणि लेखनशैलीविषयक भान अशा गोष्टी प्रेरक असतात. तसेच ऐतिहासिक साहित्यकृतीप्रमाणे विशिष्टतेकडून सामान्यत्वाकडे जाण्याची क्षमता त्यात असते. म्हणूनच आत्मचरित्र एक ललित गद्यप्रकार मानला जातो. खाजगी पत्रादी आत्मचरित्रपर लेखनप्रकार पुष्कळदा विशिष्ट व्यक्तींसाठी व विशिष्ट व्यक्तिगत संदर्भात हाताळले जातात. या लेखनप्रकारांना तात्कालिक व प्रासंगिक पार्श्वभूमी असल्याने त्यांचा आशय आणि अर्थवत्ता ही मर्यादित असतात. संस्मरणिका आणि स्मृतिचित्रे यांत बरेचसे साम्य असले, तरी संस्मरणिकेत लेखक जे व्यापक अनुसंधान ठेवतो, तसे ते काहीशा त्रोटक आणि स्वायत्त स्मृतिचित्रांत नेहमीच आढळेल, असे नाही. तरीदेखील हे दोनही लेखनप्रकार पुष्कळदा परस्परपर्यायी ठरू शकतात. आत्मचरित्र आणि संस्मरणिका यांतही फरक आहे. अनेकदा त्यांचा निर्देश समानार्थी होतो हे खरे परंतु सूक्ष्मपणे पाहिल्यास, संस्मरणिकेत लेखकाचा भर बहुधा इतर व्यक्तींवर व त्यांच्या अनुभवांवर असतो, असे दिसून येईल. याउलट आत्मचरित्राचे केंद्र लेखक स्वतःच असतो. म्हणजे असे, की आत्मचरित्र एककेंद्री असते आणि संस्मरणिका एककेंद्री नसते. आत्मचरित्रास पत्रव्यवहारादी आत्मचरित्रपर लेखनप्रकारांचा एक प्रकारची कच्ची सामग्री म्हणून उपयोग होऊ शकतो आणि आत्मचरित्रकार तशा लेखनप्रकारांचा स्वेच्छेने उपयोग करू शकतो. सारांश, आत्मचरित्रपर लेखनाचे जे अनेक प्रकार संभवतात, ते एकमेकांस पूरक असले तरी एकमेकांचे पर्यायी ठरू शकत नाहीत. click more information