Friday 17 December 2021

मंदिर कसे पाहावे?

आपल्याकडे धार्मिक पर्यटन मोठय़ा प्रमाणात केले जात असले तरी विशिष्ट देवळांत जाऊन हारफुले वाहणे, मूर्तीसमोर डोके टेकवणे या गोष्टींनाच जास्त प्राधान्य असते. वास्तविक आपल्याकडे असलेली प्राचीन मंदिरे ही त्या त्या काळात विशिष्ट हेतूने बांधली गेलेली आहेत. त्यांच्यावर कोरलेली विविध प्रतीके, मूर्ती त्या विशिष्ट काळावर प्रकाश टाकत असतात, त्या दृष्टीने मंदिर पाहायला हवे.

आपापल्या गावात किंवा परिसरात खूप सुंदर अगदी शिल्पसमृद्ध मंदिर असते. अनेकदा आपण तिथे जात असतो, पण तिथे काय पाहायचे आणि कशासाठी पाहायचं हे माहितीच नसते. वास्तविक मंदिरस्थापत्य आणि मूर्तिशास्त्र हे आपल्याकडे खूप प्रगत अवस्थेला पोहोचलं होतं. कुठलीही मूर्ती किंवा कोणतेही मंदिर बांधण्यामागे काही एक उद्देश असतो, एखादे तत्त्वज्ञान असते. ते समजून घेतले की, मंदिर पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या उत्साहाने पाहता येते. महाराष्ट्रात यादव आणि शिलाहार राजवटींच्या काळात मंदिरस्थापत्य भरभराटीला आलं होतं. शुष्क सांधी म्हणजे दोन दगडांमध्ये चुना, सिमेंटसारखे कोणतेही जोडणारे मिश्रण न वापरता निव्वळ दगडी बांधलेली मंदिरे. लोक  याला सरधोपटपणे हेमाडपंथी मंदिरे असा चुकीचा शब्द वापरून मोकळे होतो. यादव राजांचा प्रधान हेमाद्री याने ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ लिहिला. त्यात मंदिरबांधणीसंबंधीचे काही निर्देश केलेले आढळतात; पण या हेमाद्रीच्या आधीपासून आपल्याला ही शुष्कसांधी शैलीची मंदिरे आढळतात. त्यामुळे केवळ  हेमाद्रीच्या या ग्रंथातील या उल्लेखावरून या अशा मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे म्हणण्याची चुकीची पद्धत रुढ झाली. ती वास्तविक शुष्कसांधी शैलीची मंदिरे आहेत.

https://www.loksatta.com/lokprabha/vishesha/temple-tourism-1271160/ 

No comments:

Post a Comment