Thursday 25 November 2021

झांशीची राणी :

झांशीची राणी : (१९ नोव्हेंबर १८३५–१८ जून १८५८). इंग्रजांविरुद्ध लढणारी १८५७ च्या उठावातील एक पराक्रमी स्त्री. पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. ही वाईच्या मोरोपंत तांबे यांची कन्या. मोरोपंत हे दुसरे चिमाजी आप्पा यांचे कारभारी होते. मनुबाई हे तिचे पूर्वाश्रमीचे नाव. आईच्या मृत्यूनंतर ती वडिलांबरोबर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे ब्रह्यावर्तास गेली. तेथील मुक्कामात तिचे झांशीच्या गंगाधरराव नेवाळकर या संस्थानिकाबरोबर १८४२ मध्ये लग्न झाले. गंगाधरराव व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला, पण तो अल्पवयीन ठरला. तेव्हा मरणापूर्वी एक दिवस अगोदर गंगाधररावांनी पाच वर्षांचा आपल्या घराण्यातील आनंदराव हा मुलगा दत्तक घेतला व त्याचे नाव दामोदर ठेवण्यात आले. १८५३ मध्ये गंगाधरराव मरण पावले. डलहौसीने १८५४ मध्ये दत्तक पुत्र नामंजूर ठरवून झांशी संस्थान खालसा केले. या निर्णयाचा जाहीरनामा जेव्हा लक्ष्मीबाईस वाचून दाखविण्यात आला, तेव्हा तिने ‘मेरी झांशी देएंगा नही’ असे उद्‌गार काढले. दत्तक वारस नामंजूर केला, याबद्दलचे गाऱ्हाणे तिने अनेक खलित्यांद्वारे ब्रिटिश सरकारपुढे मांडले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर झांशी संस्थान खालसा करून लक्ष्मीबाईस दरमहा रु. ५,००० निवृत्तिवेतन व राजवाडा वगैरे खासगी मिळकत देण्यात आली. खजिन्यातील सु. सहा लाख रु. रक्कम दामोदर या अज्ञान दत्तक पुत्राच्या नावे ठेवण्यात येऊन झांशी संस्थानावर ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला.

https://vishwakosh.marathi.gov.in/17333/ 

No comments:

Post a Comment