Thursday 9 September 2021

अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध

अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध: उत्तर अमेरिकेतील तेरा ब्रिटिश वसाहतींनी मायदेशाविरुद्घ १७७५ पासून १७८३ पर्यंत केलेले यशस्वी बंड. त्याला ‘स्वातंत्र्ययुद्ध’ किंवा ‘अमेरिकन क्रांती’ म्हणतात.

 

सतरावे शतक व अठराव्या शतकाचा प्रथम चरण अशा दीर्घ कालावधीत अमेरिकेत अनेक यूरोपीय देशांच्या वसाहती स्थापन झाल्या. त्यांत इंग्‍लंडच्या तेरा वसाहती होत्या. या तेरा वसाहतींत स्थानिक वन्य जमाती, निग्रो गुलाम, इंग्रज, आयरिश, जर्मन, डच, स्पॅनिश, पोर्तुगीज आदी यूरोपीय असा संकीर्ण समाज नांदू लागला. यांत बहुसंख्य इंग्रज होते आणि त्यांच्या भाषेला सर्वमान्यता लाभली होती. बहुतेक वसाहतींचा कारभार ब्रिटिश शासनाने नियुक्त केलेला गव्हर्नर स्थानिक प्रातिनिधिक संस्थांच्या सल्ल्याने चालवीत असे.

 

तथापि फ्रेंच वसाहतींचा घेरा सभोवताली असल्याने ब्रिटिश वसाहतवाल्यांत सतत असुरक्षितपणाची भावना असे. स्वसंरक्षणासाठी मायदेशाच्या सैन्याची आवश्यकता असल्याने, मायदेशाने घातलेली अनेक राजकीय व आर्थिक बंधने त्यांना निमूटपणे मान्य करावी लागत. वसाहती म्हणजे स्वस्त व मुबलक कच्चा माल पुरविणारे, तसेच हव्या त्या चढ्या दराने पक्का माल घेणारे देश, असे इंग्‍लंडचे सर्वसाधारण धोरण असे. वसाहतींचा वाहतूक-व्यापार इंग्‍लंडच्याच बोटींतून (वसाहतींना स्वतंत्र बोटी नसल्याने) चालला पाहिजे, वसाहतींनी कच्चा माल इंग्‍लंडलाच विकला पाहिजे, इंग्‍लंडचाच पक्का माल विकत घेतला पाहिजे, स्वतः पक्का माल तयार करता कामा नये, कोणत्याही देशांतून माल आयात केल्यास तो प्रथम इंग्‍लंडमध्ये उतरवून मग वसाहतींत जावा इ. नौकानयन-कायद्यांतील निर्बंधांमुळे इंग्रज व्यापाऱ्‍यांचा अमाप फायदा, तर वसाहतवाल्यांची कुचंबणा होई. ह्यामुळे वसाहतींचा औद्योगिक विकास अर्थातच अशक्य झाला होता.


https://vishwakosh.marathi.gov.in/26832/ 

No comments:

Post a Comment