मानव भूगोल :मानव आपल्या बुद्धिमत्तेने व कुशलतेने सभोवार नैसर्गिक व मानवकृत पर्यावरणाचा कसा उपयोग करून घेतो, याचा अभ्यास करणारे शास्त्र. गेल्या शतकातील ‘प्राकृतिक व मानव’ अशा भूगोलशास्त्राच्या विभाजनात या शास्त्राचा उगम दिसून येतो. त्या काळातील पाश्चात्त्य औद्योगिक क्रांतीच्या प्रभावामुळे ‘मानवाचा निसर्गावर विजय’ या विचाराने भूगोलवेत्त्यांचे व इतर तज्ञांचे मन भारले गेले. तत्कालीन व काही नंतर प्रसिद्ध झालेले ग्रंथ, तसेच शालेय, विद्यापीठीय पाठ्यपुस्तके यांमधून व अध्यापनातून हा विचार स्पष्ट उमटलेला दिसतो. अनेक अज्ञात प्रदेशांचे शोधन व ज्ञात प्रदेशांचा अभ्यास यांमुळे ‘मानवावर निसर्गाचा पूर्ण प्रभाव असतो’, ही विचारसरणी त्या काळातच मांडली गेली. पण हे दोन्ही विचार आता जवळजवळ नाहीसे होऊन ‘मानव – पर्यावरणसंबंधात मानव कितीही बुद्धिमान व चतुर असला, तरी तो जीवसृष्टीचा एक घटक असल्याने त्याने निसर्गाशी मिळते-जुळते घेतले पाहिजे’, ही जाणीव शास्त्रज्ञांमध्ये प्रकर्षाने येऊ लागली आहे, हे विद्यमान मानव भूगोलशास्त्रात दिसून येते.
उगम व वाढ : या शास्त्राचा पाया घालण्याचे श्रेय फ्रेंच भूगोलतज्ञ पॉल व्हीदाल द ला ब्लाश (१८४५–१९१८) यांना दिले पाहिजे. त्यांचा ‘मानव भूगोलशास्त्राची तत्त्वे’ (१९११ इंग्लिश अनुवाद) हा अद्यापिही एक आधारभूत ग्रंथ मानला जातो. पुढे झां ब्रुने (१८६९–१९३०), आल्बेअर दमॉन्झॉन (१८७२–१९४०), सॉर् अशा तज्ञांनी ‘व्हीदाल परंपरे’ त भर घातली.
No comments:
Post a Comment