Wednesday, 20 October 2021

साहित्य :

साहित्य : मानवी जीवनव्यवहारविषयक चित्रण, विवरण, अर्थनिर्णयन, भाष्य अशा स्वरूपाच्या भाषिक अभिव्यक्तीस स्थूल मानाने ‘साहित्य’ असे संबोधिले जाते. जीवनव्यवहाराचे भावनिक, आध्यात्मिक, बौद्घिक अशा विविध अंगांनी घडविलेले सर्जनशील, वैचारिक, कल्पनात्मक, वास्तव अशा भिन्न-भिन्न स्तरांवरचे सर्वांगीण, सम्यक दर्शन साहित्यातून वाचकांस प्रतीत होते. ‘लिटरेचर’या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये ‘साहित्य’ वा ‘वाङ्‌मय’ हे पर्याय सामान्यतः समानार्थी म्हणून वापरले जातात. ‘Littera’ या मूळ लॅटिन शब्दापासून ‘लिटरेचर’ हा शब्द निर्माण झाला. Littera ही संज्ञा प्राचीन असून तिचा अर्थ वर्णमालेतील अक्षर वा अक्षरे, असा होतो. लिटरेचर ह्या संज्ञेला काळाच्या ओघात अनेक लेखक, समीक्षक, वाङ्‌मयेतिहासकार आदींनी साहित्याचा सर्वसमावेशक वा विवक्षित मर्यादित अर्थ विचारात घेऊन नानाविध अर्थ व अर्थच्छटा यांची परिमाणे बहाल केली. त्यांतून या संज्ञेचा अर्थविस्तार होऊन ती बहुआयामी व व्यापक, विस्तृत बनली. जे जे लिहिले जाते ते ते, म्हणजे सर्व लिखित मजकूर म्हणजे साहित्य, ही एक टोकाची व्याख्या काही तज्ज्ञांनी केली. अर्थातच ही भूमिका क्वचितच व अपवादाने घेतली गेल्याचे दिसते. याउलट दुसरी टोकाची भूमिका म्हणजे ⇨ इलिअड, ⇨ ओडिसी, ⇨ हॅम्लेट अशा केवळ अभिजात विश्वसाहित्याचाच निर्देश ‘साहित्य’ या संज्ञेने केला जावा, ही भूमिकाही फारशी स्वीकारार्ह ठरली नाही. या दोन टोकांच्या मध्ये अनेक परस्परभिन्न, विविधांगी भूमिका व दृष्टिकोण घेतले गेल्याचेही दिसून येते. लिटरेचर ही संज्ञा सैलसर व व्यापक अर्थाने अनेक संदर्भांत वापरली जाते. मराठीतील साहित्य व वाङ्‌मय या संज्ञांबाबतही हेच म्हणता येईल. उदा., एखाद्या विशिष्ट भाषेत निर्माण झालेले, विशिष्ट देशाचे साहित्य (अमेरिकन साहित्य फ्रेंच साहित्य इ.) विशिष्ट कालखंडात निर्माण झालेले साहित्य (एकोणिसाव्या शतकातील वाङ्‌मय) विशिष्ट जमातीने, लोकसमूहाने निर्माण केलेले वा विशिष्ट प्रदेशातील साहित्य (अमेरिकन-इंडियन साहित्य, निग्रो साहित्य, दलित साहित्य, प्रादेशिक वाङ्‌मय इ.) विशिष्ट विषयाला वाहिलेले साहित्य (क्रीडा, बागकाम आदी विषयांवरील लिखाण) इत्यादी. साहित्य व वाङ्‌मय ह्या संज्ञा सामान्यतः जरी समानार्थी वापरल्या जात असल्या, तरी त्यांच्या अर्थात व उपयोजनात भेद करावा, असे काही समीक्षकांनी सुचविले आहे. वाङ्‌मय हा शब्द अधिक व्यापक अर्थाने वापरावा, असे रा. श्री. जोग यांनी सुचविले आहे. डॉ. अशोक रा. केळकरांच्या मते ललित वाङ्‌मयालाच ‘साहित्य’ म्हणावे. साहित्य ही संज्ञा अर्थदृष्ट्या सारस्वत, विदग्ध वाङ्‌मय या संज्ञांच्या जवळ जाणारी आहे.

Click link fore more information

https://vishwakosh.marathi.gov.in/25690/ 

No comments:

Post a Comment