Tuesday 12 October 2021

मृदा:

मृदा: मृदा म्हणजे शेतजमीन किंवा शेतमाती. ही एक स्वतंत्र सचेतन वस्तू आहे. ती नुसतीच झिजलेल्या खडकाचा चुरा नसून सचेतन आणि क्रियाशील आहे त्यामुळेच तीवर वनस्पती तग धरू शकतात. मृदा शब्दाची व्याख्या निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी निरनिराळ्या रीतींनी केली आहे. सारांशाने ज्यावर वनस्पतीस आधार मिळतो, त्यांचे पोषण होते व त्या वाढू शकतात असा भूकवचाचा झिजलेला (रूपांतरित) थर म्हणजे मृदा असे म्हणता येईल. थोडक्यात मृदेवरच सकल प्राणिमात्रांचे जीवन, पालन, पोषण व पुनरूज्जीवन अवलंबून असते म्हणून मातीबद्दलचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. किंबहुना शास्त्रीय शेतीचा मृदा हा पायाच म्हणावा लागेल. जमिनीतून चांगले पीक काढता आले नाही, तर आपणास तिच्या समस्या समजल्याच नाहीत असे म्हणावे लागेल. कारण पिकासाठी योग्य जमिनीची निवड झाल्यास, तसेच जमिनीतील उणिवा योग्य प्रकारे भरून काढल्यास भरघोस पिके हमखास काढता येतात.

सर्वसामान्य माणूस मातीस अचेतन व निरुपयोगी पदार्थ म्हणून मानतो पण या मातीत वनस्पतींना पोषक अशी अन्नद्रव्ये असतात आणि म्हणूनच एक किग्रॅ. मक्याचे बी पेरले, तर त्यापासून २,००० ते ३,००० किग्रॅ. मका मिळू शकतो. येथे मृदा शब्द हा शेतजमीन ह्या अर्थी वापरला असून त्या दृष्टीनेच तिची उत्पत्ती, भौतिक व रासायनिक गुणधर्म, सर्वेक्षण व वर्गीकरण वगैरे बाबींचे विवरण केलेले आहे.

मृदा उत्पत्ती मूळ खडकावर ऊन, वारा, पाऊस इत्यादींमुळे होणाऱ्या अखंड वातावरणक्रियेने (आघाताने व प्रत्याघाताने रूपांतर होऊन) त्याची माती बनते. सर्वप्रथम खडक तुटून फुटून त्याचे लहान लहान तुकडे बनतात व यास भौतिक झीज क्रिया म्हणतात. त्यानंतर ऑक्सिडीकरण [⟶ ऑक्सिडीभवन], विद्रावीकरण (विरघळण्याची क्रिया), जलसंयोगीकरण, कार्बनीकरण इ. विघटन क्रियांमुळे त्यातील खनिज पदार्थांचे अपघटन (रेणूचे तुकडे होऊन घटक द्रव्ये अलग होण्याची क्रिया) व परिवर्तन होते. अशा प्रकारच्या भौतिक आणि रासायनिक झीज क्रिया अखंडपणे चालू असतात व त्याचबरोबर जैव घटकांचे कार्यदेखील चालू असते. त्यामध्ये सूक्ष्मजीव, त्यापेक्षा मोठे सजीव, पालापाचोळा, वनस्पतींची मुळे ही विघटनाच्या कार्यात मदत करतात आणि मातीत कार्बनी घटकाची वाढ होते. अशा रीतीने जमिनीचा पृष्ठभाग बनण्यास सुरुवात होते व हलके हलके ही झीज क्रिया पृष्ठभागाखाली सरकत जाते व परिणामी मातीस एक सलग स्वरूप प्राप्त होते आणि निरनिराळ्या थरांची उत्पत्ती होते. जमिनीची खोली काही सेंटिमीटरांपासून ते अनेक मीटरांपर्यंत असू शकते आणि ही खोली जमीन कोणत्या परिस्थितीत बनली त्यावर अवलंबून असते. अशा रीतीने अचेतन खडकापासून सचेतन अथवा क्रियाशील असा मातीची पिंड तयार होतो व त्यास एक विशेष प्रकारची संरचना व आकार असतो (आ. १). एच्. एच्. बेनेट या शास्त्रज्ञांच्या मते पृष्ठभागावरील मातीचा ३० सेंमी. थर तयार होण्यास सु. ६,००० वर्षांचा कालावधी लागतो.

Click link more information

https://vishwakosh.marathi.gov.in/30374/ 

No comments:

Post a Comment