संभाजी, छत्रपति : (१४ मे १६५७-११ मार्च १६८९). छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठयांच्या गादीवर आलेले हे दुसरे छत्रपती. हौतात्म्यामुळे अजरामर झालेले एक पराक्रमी पुरूष. त्यांचा जन्म छ. शिवाजी महाराज व सईबाई यांच्या पोटी पुरंदर किल्ल्यावर (पुणे जिल्हा) झाला. त्यांना तीन वडीलबहिणी होत्या. सईबाईंच्या अकाली मृत्यूनंतर (१६५९) त्यांचा सांभाळ आणि शिक्षण आजी जिजाबाईंनी केले. सभासद व चिटणीसांच्या बखरींतून याविषयी तपशील आढळतात. केशवभट आणि उमाजी पंडित यांनी त्यांना उत्तम शिक्षण दिले. केशवभटांनी त्यांना दंडनीती व प्रयोगरूप रामायण ऐकविले. शिवाय राजपुत्रास आवश्यक असे घोडयावर बसणे, शस्त्रविदया, तालीम, तिरंदाजी वगैरेंचे शिक्षण दिले. छ. संभाजींच्या दानपत्रावरून (२७ ऑगस्ट १६८०) त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते. त्यांनी स्वतः लिहून घेतलेल्या तीन भागांतील बुधभूषण या गंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विविदया यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. यात राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लगार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती दिली आहे. याशिवाय गागाभट्टांकडून नीतिपर समयनय हा गंथ (पोथी) त्यांनी लिहून घेतला (१६८१) आणि धर्म कल्पलता हा धर्मशास्त्रावरील गंथ केशव पंडिताने संभाजीराजांसाठी लिहिला (१६८२). युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ॲबे कॅरे या परकीय लेखकाने संभाजींची प्रशंसा केली आहे. संभाजीराजांचा विवाह पिलाजीराजे शिर्के यांची कन्या राजसबाईबरोबर झाला (१६६५). तिचे नाव येसूबाई ठेवण्यात आले. येसूबाईपासून कन्या भवानीबाई (१६७८) आणि पुत्र शिवाजी (१६८२- छत्रपती शाहू) ही दोन अपत्ये संभाजीराजांना झाली. चंपा ही त्यांची दुसरी राजपूत पत्नी. तिला माधोसिंग व उधोसिंग हे दोन मुलगे झाले.
जादा माहितीसाठी खालील लिंक वर click करा
No comments:
Post a Comment