Sunday, 11 July 2021

नवकेन्सीय अर्थशास्त्र (Neo-Keynesian Economics)

समष्टीय अथवा समग्रलक्ष्यी अर्थशास्त्रातील एक सैद्धांतिक प्रवाह. इ. स. १९३६ मध्ये जॉन मेनार्ड केन्स यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या समष्टीय यंत्रणेबाबत मूलभूत सैद्धांतिक मांडणी केली, ज्यास ‘केन्सीय क्रांती’ असे संबोधले जाते. ‘नवअभिजात अर्थशास्त्रीय तत्त्वे’ आणि ‘सार्वत्रिक समतोल सिद्धांत’ या अर्थशास्त्राच्या मुख्य प्रवाहातील प्रचलित सैद्धांतिक चौकटींच्या दृष्टीकोनातून केन्स यांच्या या सैद्धांतिक मांडणीचा अर्थ लावण्याचे, आकारिक स्वरूपातील मांडणी करण्याचे, तसेच केन्स यांच्या मूळ विश्लेषणास विकसित व विस्तारित करण्याचे जे प्रयत्न इ. स. १९३७ ते १९७० या कालावधीत विविध अर्थतज्ज्ञांनी केले, त्यांस एकत्रित रीत्या नवकेन्सीय अर्थशास्त्र किंवा नवअभिजात समन्वय किंवा नवअभिजात-केन्सीय समन्वय असे संबोधले जाते.

भांडवलशाही बाजाराधारित अर्थव्यवस्था या मूलतः अस्थिर असून पुनरुत्थानाच्या किंवा पूर्णपणे कोसळण्याच्या स्पष्ट प्रवृत्तीविना अर्थव्यवहाराच्या अवसामान्य (सब-नॉर्मल) आणि अप-इष्टतम (सब-ऑप्टीमल) पातळीला स्वस्थ स्थिती गाठू शकतात, असा दावा केन्सीय विश्लेषणाचा गाभा आहे. केन्स यांच्या मते, या अस्थिरतेच्या मुळाशी समग्र मागणीमधील चढउतार असून हे चढउतार भांडवलाच्या सीमांत कार्यक्षमतेमध्ये चक्रीय बदल होण्यातून गुंतवणूक खर्चामध्ये घट होण्यामुळे संभवतात. या अस्थिरतेतून निर्माण होणारी बेरोजगारी ही अनैच्छिक असून समग्र मागणीची कमतरता त्यास कारणीभूत असते. अर्थव्यवस्थेला समतोलाकडे नेण्याची बाजारयंत्रणेची शक्ती कमकुवत असल्याने ही अस्थिरता कमी करण्यामध्ये, तसेच अर्थव्यवस्थेला पूर्ण रोजगार स्थितीकडे नेण्यामध्ये राजकोषीय आणि चलनविषयक धोरणे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असा केन्सीय विश्लेषणाचा अर्थ होता. स्पर्धात्मक बाजारातील स्वहित साधण्याच्या हेतूने प्रेरित असंख्य अभिकर्त्यांच्या निर्णयांमधून समष्टीय पातळीवरील इष्टतम निष्पत्ती होत असते, या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ ॲडम स्मिथ यांच्यापासून सार्वत्रिक समतोल सिद्धांतापर्यंत चालत आलेल्या विश्लेषणात्मक वारशाला केन्सीय विश्लेषणाने आव्हान दिले.

Click link more information

https://marathivishwakosh.org/52740/ 

No comments:

Post a Comment