लोदी घराणे : (१४५१-१५२७). मुसलमानी अंमलातील दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेले मोगलपूर्व काळातील शेवटचे प्रसिद्ध घराणे. ⇨फिरोझशाह तुघलकच्या काळात (१३०९?- १३८८) भारतात आलेल्या अफगाण घराण्यांपैकी लोदी घराणे हे एक होय. मलिक बहराम लोदी हा प्रथम मुलतानच्या राज्यपालाच्या सेवेत रुजू झाला. त्याच्या पाच मुलांपैकी मलिक काला याचा बहलूल हा पुत्र. लहानपणीच आईवडिलांच्या छत्राला पारखा झालेल्या बहलूलचे पालनपोषण इस्लामखान नावाच्या अफगाणाने आपल्या मुलाप्रमाणे केले. बहलूलखानाने सरहिंद प्रांत जिंकून अफगाणांचे नेतृत्व संपादन केले. पुढे, पंजाब, दिल्ली जिंकून त्याने १४५१ मध्ये लोदी घराण्याची स्थापना केली. या घराण्यात एकूण तीन सुलतान झाले : (१) बहलूल लोदी (कार. १४५१-८९), (२) शिकंदर लोदी (कार. १४८९-१५१७) आणि (३) इब्राहीम लोदी (कार. १५१७-२६).
बहलूल गादीवर आला, तेव्हा दिल्लीचे फारच थोडे राज्य शिल्लक होते. बहलूलने दिल्ली साम्राज्याची तुघलकानंतर गेलेली प्रतिष्ठा परत मिळविली. त्याने जोधपूर, मेवाड, रोहिलखंड व ग्वाल्हेर हे प्रांत दिल्लीच्या राज्यास जोडले आणि आपल्या अफगाण अनुयायांना बरोबरीच्या नात्याने वागविले. आपल्या भावांना आणि इतर अफगाणांना ठिकठिकाणी सुभेदार नेमले. तो हुषार आणि व्यवहारी होता. त्याच्या दरबारात राजपूत राजे होते.
Click link
No comments:
Post a Comment