Tuesday, 27 September 2022

भारतीय इतिहासातील साधने


तिहाससाधने : कोणत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारांनी होते. इतिहासकाळाचे प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन असे तीन विभाग मानून त्यांत समाविष्ट होणाऱ्या साधनांचा विचार करता येतो. साधनांचे लिखित व अलिखित साधने असेही एक वर्गीकरण करता येते. लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो. अलिखित साधनांत पुरातत्त्वीय वस्तू, भांडी, आयुधे, चित्रे, शिल्पे, वास्तू व स्मारके यांचा समावेश होतो. याशिवाय इतिहाससाधनांच्या भाषेवरून उदा., मराठी, फार्सी, डच, इंग्रजी इ. किंवा लेखनासाठी वापरण्यात आलेली माध्यमे उदा., सोने, तांबे, रुपे, कातडे, लाकूड, कागद, भूर्जपत्र, दगड, माती इत्यादींवरूनही इतिहास साधनांचे वर्गीकरण करता येते. समकालीन, उत्तरकालीन तसेच सार्वकालीन व विशिष्टकालीन असेही वर्गीकरण करता येते.

प्रत्येक देशाला आपल्या इतिहासलेखनासाठी इतिहास साधनांचा उपयोग होतो. भारताबाहेर पश्चिमेच्या बाजूस विशेषतः इराणचा पश्चिम भाग, इराक, तुर्कस्तानचा पूर्व भाग, सध्याचा इझ्राएल, क्रीट व सायप्रस बेटे, ईजिप्त आणि अटलांटिक महासागराच्या पलीकडील मेक्सिको वगैरे प्रदेशांत अनेक संस्कृती उदयास आल्या. त्यांसंबंधींच्या अलिखित साधनांत पिरॅमिड, स्फिंक्स, अवाढव्य पुतळे, मंदिरे इत्यादींचा समावेश होतो. या संस्कृती नष्ट होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. या बहुतेक संस्कृतींचे अवशेष जमिनीत गाडले गेल्याने अनेक वर्षे या संस्कृती अज्ञात राहिल्या. पंधराव्या शतकापासून म्हणजे यूरोपीय प्रबोधनकाळापासून या संस्कृतींच्या भूमिगत व भूमिवरील अवशेषांकडे काही यूरोपीय विद्वानांचे लक्ष वेधले. त्यांनी या सर्व प्रदेशांत संचार व उत्खनन करून शोधलेल्या अवशेषांपैकी एक भाग लिखित साधनांचा आहे. ही लिखित साधने फार प्राचीन असल्यामुळे त्यांची भाषा व लिपी समजणे कठीण होते. सुदैवाने ईजिप्तमध्ये रोझेटा या स्थळी एक त्रैभाषिक शिलालेख सापडला. त्यावर सामान्यतः एकच मजकूर ⇨ हायरोग्लिफिक, डेमॉटिक व ग्रीक अशा तीन लिप्यांत आहे. त्यातील ग्रीक मजकुराचा काळ हायरोग्लिफिक लिपी समजण्यास फार उपयोगी झाला. रोझेटा पाषाणलेखाप्रमाणेच इराणमध्ये बेहिस्तून येथेही एक त्रैभाषिक लेख सापडला. त्यातील एक लिपी प्राचीन फार्सी असल्यामुळे उरलेल्या दोन भाषांचे स्वरूप ज्ञात झाले. या दोन लेखांमुळे ईजिप्त, बॅबिलोनिया, सुमेरिया व ॲसिरिया तसेच हिटाइट व मितानी या संस्कृतींची माहिती देणाऱ्या लिखित साधनांचा उत्तम प्रकारे उलगडा झाला. तथापि क्रीट-सायप्रस व भारतातील सिंध प्रदेशात सापडलेल्या अवशेषांतील प्राचीनतम लेखांचा अद्यापि म्हणावा तितका स्पष्ट उलगडा झालेला नाही. अमेरिकेतील माया, इंका इ. संस्कृतींचीही परिस्थिती काही प्रमाणात अशीच आहे.

click link

https://vishwakosh.marathi.gov.in/24554/ 

No comments:

Post a Comment