Tuesday 27 September 2022

विजयानगर साम्राज्य:

विजयानगर साम्राज्य: दक्षिण भारतातील मध्ययुगीन काळातील एक प्रसिद्ध साम्राज्य. इ. स. १३३६ मध्ये कर्नाटकातील विद्यमान बेल्लारी जिल्ह्यात होस्पेट तालुक्यातील ⇨हंपी (विजयामगर) येथे तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेस संगमाचे पुत्र ⇨पहिला हरिहर (कार. १३३६−५६), ⇨पहिला बुक्क (कार. १३५६−७७), मुद्दण, मारप्पा व कंपण या पाच बंधूंनी या राज्याची स्थापना केली. या बंधूंना विद्यारण्य म्हणजे ⇨माधवाचार्य (सु. १२९६−१३८६) स्वामींनी प्रेरणा दिली, अशी वदंता आहे. या साम्राज्याच्या विस्तार दक्षिणोत्तर बेळगावपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पूर्व-पश्चिम आंध्रपासून गोव्यापर्यंत झाला होता. तथापि विजयानगरचे आधिपत्य मानणाऱ्या राजांच्या प्रदेशांचा विचार केल्यास या साम्राज्याची सत्ता उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत आणि पूर्वेस कटकपर्यंत (ओरिसा राज्य) भिडल्याची दिसते. सुमारे सव्वादोनशे वर्षे विजयानगरच्या सम्राटांनी अधिसत्ता टिकून होती. त्या काळात त्यांनी दक्षिणेत हिंदू संस्कृतीचे संवर्धन-प्रसार-प्रचार कार्य केले आणि दक्षिणेतील मस्लिम शाह्यांच्या राज्यविस्तारास पायबंद घातला. विजयनगर हंपी, पंपाक्षेत्र, होस्पेट इ. वेगवेगळ्या नावांनीही विजयानगरचा उल्लेख केल्याचे दिसून येते. इ. स. १३७३ च्या सुमारास विद्यानगरची (विजयानगर) सेना दक्षिण समुद्रापर्यंत पोहोचली. जवळजवळ दक्षिण हिंदुस्थानातील संपूर्ण प्रदेशावर या सेनेने दिग्विजय मिळविला. त्याप्रीत्यर्थ पहिल्या बुक्क राजाने ‘विद्यानगर’ या आपल्या नगरीचे नाव बदलून ‘विजयानगर’ असे ठेवले. तथापि स्थानिक लोक हंपी असाच याचा उल्लेख करतात.

ऐतिहासिक साधने: विजयानगरविषयी ऐतिहासिक साधनसामग्री विपुल प्रमाणात मिळते. तीत विविध प्रकारची नाणी (सोने, चांदी, तांबे), पुरातत्वीय अवशेष, विपुल ⇨कोरीव लेख तसेच ताम्रपट असून संगम, साळुव आणि तुळव वंशातील राजांची दानपत्रे आणि अज्ञापत्रे, परकीय प्रवाशांचे वृत्तांत वंशावळी व विशेष कार्याचीही विश्वसनीय माहिती मिळते. एक विश्लासार्ह साधन म्हणून या शिला लेखांना विशेष महत्त्व आहे. हे लेखसंग्रह (कॉपर्स ऑफ इन्स्क्रिप्शन) ॲन्युअल रिपोर्ट्‌स ऑफ एपिग्राफिया, आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे वार्षिक अहवाल, एपिग्राफिया कर्निटिका (खंड ३-१२), म्हैसूर इन्स्क्रिप्शन्स (खंड १ ला), म्हैसूर आर्किऑलॉजिकल रिपोर्ट्‌सनेल्लोर डिस्ट्रिक्ट इन्स्क्रिंप्शन्स (खंड १−३), पुदुकोट्टईं स्टेट इम्स्किप्शन्स. साउथ इंडियन इन्स्क्रिप्शन्स (खंड ४−६) इत्यादींतून प्रसिद्ध झाले आहेत. यांशिवाय ⇨फिरिश्ता (१५५० ? – १६२३?), निजामुद्दिन व सय्यद अली तबातबा या फार्सी इतिहासकारांच्या अनुक्रमे गुलशन-इ-इन्नावहिनीतबकास-इ-अकबरी आणि बुर्हान-इमआसिर या ग्रंथातून तत्संबंधीची माहिती मिळते. विजयानगर साम्राज्याला निकोले दी, काँ ती, फीगॅरॅदू, बार्बोसा, ⇨अब्दअल्-रझाक (१४१३−८२), पायीश, नूनीश इ. परकीय प्रवाशांनी आपल्या प्रवासवृत्तांतून तसेच पत्रे, दिनदर्शिका व अन्य वृत्तांत यांतून तत्कालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थितीसंबंधी माहिती दिलेली आहे, यांशिवाय ⇨आदिलशाही, ⇨ निजामशाही, ⇨कुत्बशाही या शाह्यांतील तवारिखांतून विजयानगरसंबंधी काही महत्त्वाचे उल्लेख व तपशील उपलब्ध होतात.

Click link more information

https://vishwakosh.marathi.gov.in/32626/ 

No comments:

Post a Comment