चालुक्य घराणे : दक्षिणेत विशेषतः कर्नाटक व महाराष्ट्र यांत पाचव्या शतकात उदयास आलेला एक प्रसिद्ध वंश. या वंशाची एक शाखा अधिक प्रसिद्ध पावली. ती म्हणजे बादामीचे चालुक्य व त्यांचे वंशज कल्याणीचे चालुक्य, याशिवाय त्यांच्या इतर लहान शाखा गुजरात, तेलंगण व इतरत्र पसरल्या होत्या. कोरीव लेखांत या घराण्याचे नाव चालिकी, साल्की, चलिक्य, चालुक्य, चलुकिक इ. विविध प्रकारांनी आढळते. हे घराणे मूळचे कर्नाटकातील पण दहाव्या शतकापासून दक्षिणेतील कल्याणीच्या राजवंशाने स्वतःस सोमवंशी कल्पून उत्तरेतील सुप्रसिद्ध पौराणिक सोमवंशाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. उलट बादामी चालुक्यांची एक शाखा वेमुलवाड्याचे चालुक्य स्वतःस सूर्यवंशी म्हणवीत. या घराण्याचा मूळ पुरुष उदयन व त्यानंतरचे अठ्ठावन राजे अयोध्येस राज्य करीत होते, त्यातील शेवटचा विजयादित्य दक्षिणेत आला. त्याने त्रिलोचननामक पल्लव राजाचा पराजय केला. त्याच्या मृत्यूनंतर झालेल्या त्याच्या विष्णुवर्धननामक पुत्राने चालुक्य पर्वतावर भगवती, नंदा गौरी, कार्तिकेय, नारायण, सप्तमातृका या देवतांची आराधना केली आणि कदंब, गंग इ. राजवंशांना जिंकून आपले राज्य स्थापिले इ. काल्पनिक कथा उत्तरकालीन लेखात दिली आहे. या राजवंशाच्या चालुक्य नावाची उपपत्ती तो ब्रह्मदेवाच्या किंवा हारिति–पंचशिख ऋषीच्या चुलुकातून (ओंजळीतील पाण्यापासून) निर्माण झाला, असे सांगून लावली आहे
click करा
No comments:
Post a Comment