टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर : (२३ जुलै १८५६–१ ऑगस्ट १९२०). थोर भारतीय नेते, भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखलगाव (ता. दापोली, जि. रतिनागिरी). चिखलगावची खोतीदारी त्यांच्याकडे होती. पणजोबा केशवराव यांनी पेशव्यांच्या काळात मानाची जागा मिळवली होती. आजोबा रामचंद्रपंत यांनी उत्तर आयुष्यात संन्यास घेतला. टिळकांचे वडील गंगाधरपंत व आई पार्वतीबाई. गंगाधरपंतांना कौटुंबिक अडचणीमुळे इंग्रजी शिक्षण सोडून पुण्याहून गावी जावे लागले. पुढे त्यांनी मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. बाळ गंगाधऱ टिळकांचे पारंपरिक संस्कृत अध्ययन घरातच झाले. १८६६ मध्ये गंगाधरपंतांची बदली पुण्यास झाल्यामुळे टिळक आपल्या मातापित्यांबरोबर पुण्यास आले. पुण्यास आल्यावर थोड्याच दिवसांत टिळकांची आई मरण पावली आणि गंगाधरपंतांची बदलीही ठाण्यास झाली. तथापि पुण्यात राहूनच ते १८७२ मध्ये मॅट्रिक झाले. तत्पूर्वी १८७१ मध्येच त्यांचा कोकणातील लाडघर गावच्या बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामाबाई (माहेरचे नाव तापीबाई) यांच्याशी विवाह झाला. त्यांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते. त्यांचे नातू ज. श्री. टिळक हे केसरीचे विद्यमान संपादक असून खासदार आहेत. गंगाधरपंत १८७२ मध्ये निधन पावले. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी काही रक्कम ठेवली होती. त्यामुळे टिळकांनी डेक्कन कॉलेजमध्ये नाव घालते. महाविद्यालयातील पहिल्या वर्षी नियमित व्यायाम करून प्रकृती सुदृढ व निकोप राखण्यावर त्यांनी भर दिला.
Click link
No comments:
Post a Comment