Saturday, 1 August 2020

अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe)



साठे, अण्णाभाऊ : (१ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९ ). कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर, ख्यातनाम मराठी साहित्यिक. अण्णाभाऊंचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगावचा, उपेक्षित समजल्या गेलेल्या मातंग समाजातील. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे, तर आईचे नाव वालबाई होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा जि. सांगली ). त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले. १९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. कामगारांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. मुंबईत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली. पक्षाचे कामही ते करीत होतेच, तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. तमाशातून जुन्या चालीचा सुरवातीचा साठा अण्णाभाऊंनी आत्मसात केला. मुंबईत परतताच त्यांना मॅक्झिम गोर्कीचे साहित्य वाचायला मिळाले. लिखाणाची उर्मी त्यांना याच साहित्यानं दिली. तो काळ १९४२ च्या चळवळीचा. ते स्वातंत्र्य समरांगणात सहभागी झाले, म्हणून इंग्रज सरकारने त्यांच्यावर पकड वारण्ट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले, त्याच काळात त्यांची भेट शाहीर अमर शेख, द. ना. गव्हाणकरांशी झाली. आपसातले हेवेदावे, गरीब जनतेला, शेतकऱ्यांना मिळणारा, छळणारा दारिद्र्याचा झगडा त्यांनी न्याहाळला होता. त्यातच मॅक्झिम गोर्कीच्या साहित्यानं प्रभावित झालेल्या त्यांच्या अंतरीच्या उर्मीं प्रतिभेला बहर आला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला. त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘ लाल बावटा ’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्ध झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
click link

No comments:

Post a Comment