Friday, 17 December 2021

वाडा

वाडा : एक गृह-वास्तुप्रकार. धनिक मालकाच्या आकाराने बऱ्याच मोठ्या असलेल्या निवासस्थानास मराठीत ‘वाडा’ हा काहीसा सन्मानदर्शक शब्द वापरतात. निवासास आवश्यक अशी आतिथ्यगृह, विश्रामस्थान, भोजनगृह, दालने मोठ्या आकाराच्या उघड्या चौकांभोवती बांधण्यात येत. सामान्यतः दोन चौक असत परंतु उत्तर पेशवाईत सात चौक असणारे वाडे बांधण्यात आले (आता नष्टप्राय झालेला मोरोबादादाचा वाडा, पुणे). चौकांमुळे  सर्व दालनांत हवा व उजेड भरपूर  प्रमाणात मिळत असत.  

खेड-शिवापूर (जि. पुणे) येथील वाडा : (१) मुखदर्शन, (२) आराखडा.
खेड-शिवापूर (जि. पुणे) येथील वाडा : (१) मुखदर्शन, (२) आराखडा.

दालनांची विभागणी पंरपरागत पद्धतीने होई. मोठ्या दरवाज्यातून पहिल्या चौकात प्रवेश मिळे. समोरच्या बाजूला वाड्याच्या मालकाची बैठक असे. डाव्या-उजव्या हातांच्या ओवऱ्यांत कचेरी, म्हणजे कारकुनांचा फड असे. आल्यागेल्यांचे स्वागत येथेच होई. याच चौकात बैठकीच्या ओवरीच्या उजवीकडे देवघर असे. बहुधा त्याभोवती लाकडी जाळी बसविलेली असे. या ओवरीतून आत गेल्यावर दोन्ही बाजूंस माडीवर जाण्यासाठी जिने असत. तसेच पुढे गेल्यावर मध्यघर किंवा माजघर (घरातील स्त्रियांचे विश्रांतिस्थान) त्यातून पुढे गेल्यावर दुसरा किंवा आतला चौक, त्याभोवतीच्या दालनात स्वयंपाकघर, जेवणघर अशी व्यवस्था असे. याच चौकात तुळशीवृंदावन असे.  

वरच्या मजल्यावर ‘सदर’ किंवा सभेचा दिवाणखाना असे. यात कीर्तन, नृत्य, गायन इ. कार्यक्रम होत. या दालनाच्या भिंतीत घरातील स्त्रियांना कार्यक्रम पाहण्यासाठी जाळ्या ठेवल्या जात. त्यांतल्या त्यांत संपन्न व रसिक गृहस्थांच्या वाड्यांतून ‘आरसेमहाल’, ‘चित्रशाला’, अशी वेगळी दालने असत (अदालत वाडा, सातारा पटवर्धन वाडा, तासगाव रंगमहाल, चांदवड ). याच मजल्यावर शय्यागृहे व क्वचित  खजिन्यांची खोली असे (तासगाव नगरकर वाडा, कान्हूर). सामान्यपणे वाडे दुमजली असत व एखाद्या भागावर गच्ची ठेवून बाकी भागावर कौलारू छपरे घालीत. जिन्यालगतच्या एकदोन खोल्या जास्त मजल्यांच्या करत. त्यांत झोपाळे इ. असत व मालकाच्या आमोद-प्रमोदासाठी त्या बांधत (रास्ते वाडा, पुणे). शनिवार वाड्याला (पुणे) सात मजले होते ते या प्रकारचे. 

वाड्याचा तळमजला भक्कम दगडी बांधणीचा असे. बऱ्याच ठिकाणी पायाची जागा दगडी बळदांनी किंवा तळघरांनी घेतलेली असे. वाड्याची रचना मुख्यतः लाकडी खांब व तुळया यांच्या सांगाड्याभोवती होत असे. वरच्या मजल्याचे बांधकाम विटांचे असे व भिंती बऱ्याच जाड, पुष्कळदा पाच फुट रुंदीच्या असत.  

सजावटीसाठी दोन-तीन प्रकार वापरीत. लाकडी खांब, तुळया, हस्त (ब्रॅकेट), पटई यांवर हरप्रकारचे कोरीव काम करण्यात येई. यासाठी वेलपत्ती, पक्ष्यांच्या आकृत्या यांचा वापर होई. सुरूचे खांब व मेहेरपीच्या कमानी यांचा वापर सदरेसाठी होई. तेलपाणी देऊन लाकूडकाम लखलखीत ठेवीत. भिंतींत लहानमोठ्या आकारांचे कमानदार कोनाडे कोरण्यात येत आणि त्यांत तसेच भिंतींच्या पृष्ठांवर रंगीत चित्रेही काढण्यात येत. चित्रांत मुख्यतः दशावतार, कृष्णलीला, द्रौपदीस्वयंवर, शिकार किंवा युद्धे यांचे देखावे असत (रंगमहाल, चांदवड निपाणकर–देसाई वाडा, निपाणी वाईचा रास्ते वाडा). 


अठराव्या शतकात पुण्यासारख्या  ठिकाणी कात्रजसारख्या घाटावरून भूमिगत नळातून पाणी आणल्यावर चौकातून हौद, कारंजी, बागा दिसू लागल्या.  अन्यथा वाड्यालगत विहीर असे व तीतून पाणी मिळत असे. वाड्यापासून दूर अंतरावर स्वच्छतागृहे बांधीत.  

उत्तर पेशवाईत वाड्याभोवती तट बांधून मोठाले कमानदार दरवाजे व त्यांवर नगारखाने बांधण्यात येऊ लागले. वाड्याचे रूपांतर गढीत झाले. 

उत्तर पेशवाईत गुजरात व दिल्ली अशा दोन शैली, मुख्यतः लाकूडकामाच्या आधारे पृथक्‌पणे दिसतात. परंतु वाड्यांची विधाने, बांधकामाचे साहित्य व रचनातंत्र दोन्हींनाही समानच होती. महाराष्ट्रात पेशवेकाळात अनेक वाडे उभे राहिले. निदान अगदी अलीकडेपर्यंत अवशिष्ट असलेले वाडे त्या काळातले होते. तथापि त्यापेक्षा प्राचीन वाडे (चौदाव्या पंधराव्या शतकांतील) पैठण येथे आढळतात. प्राचीन संस्कृत साहित्यात (उदा. बाणभट्टाची कादंबरीसमरांगण सूत्रधार इ.) येणारी वाड्यांनी वर्णने ताडून पाहता, वाड्याचे विधान परंपरागत, निदान गुप्तकाळापर्यंत तरी मागे जाणारे असावे, असे दिसते. बौद्ध लेण्यांतील ⇨विहार हेही मोठ्या वाड्याच्या विधानाचे पूर्वज म्हणता येतात. प्राचीन ग्रीक-रोमन संस्कृतींत उघड्या चौकाभोवती घरे बांधण्याची पद्धत होती, त्यामुळे हवा खेळती राहून सर्व दालनांना उजेडही मिळे. थोडक्यात आज ‘वाडा’ या शब्दाने डोळ्यासमोर येणारा ⇨गृहवास्तुप्रकार प्राचीन व सार्वत्रिक परंपरेचा अलीकडील आविष्कार म्हणता येईल. 

https://vishwakosh.marathi.gov.in/32401/ 

No comments:

Post a Comment