वाड्यांचा इतिहास : वाडा हा महाराष्ट्रात विकसित झालेला परंपरागत निवासस्थानाचा प्रकार आहे. हा वास्तुप्रकार पेशवेकाळात उदयास आला. मराठा साम्राज्यात साधारणपणे सतराव्या शतकाच्या शेवटी ते १८१८ पर्यंत (पेशवे ब्रिटिशांच्या अधीन होईपर्यंत) वाडासंस्कृती पुण्यात भरभराटीस आली. पुढे १९ व्या शतकातही वाडे बांधले गेले, परंतु पेशवेकाळातच वाड्यांची खऱ्या अर्थाने भरभराट झाली. दुसरा पेशवा बाजीराव (पहिला) याने पुण्यास राजधानी हलविली. बाजीरावाने १७३०-३२ च्या सुमारास ‘शनिवार– वाडा‘ हा राजेशाही वाडा बांधला. त्यानंतर अठराव्या शतकाच्या मध्यावर पुण्यात अनेक मंदिरे, घाट आणि वाडे बांधले गेले. बाजीराव (पहिला) याने पुण्याला राजधानी बनविले, त्याआधी पुण्यात सहा पेठा अस्तित्वात होत्या. पेठ बांधणे हा सरकारी आणि खाजगी असा संयुक्त उपक्रम असे. त्याकाळी राज्यकर्ते आपल्यातल्या विश्वासू माणसांस पेठ बांधण्याचा हक्क, परवानगी आणि जबाबदारी द्यायचे. पेठा बांधण्याचे काम सरकारी नियोजन आणि तात्कालिक निर्णय यातून पूर्णरुपास यायचे. पेशवाईच्या काळात पेठा बांधण्याच्या कामाला औपचारिक स्वरूप आले. या काळात पेठा बांधण्याचे शेटे आणि शेटे-महाजन या मंडळीना देण्यात येऊ लागले. त्यांच्या कामाचं स्वरूप हे लोकोपयोगी सुविधा पुरवण्याचं असे. रस्ते बांधणी करणे, जागेची बांधकामयोग्य विभागणी करणे, सोयीसुविधा पुरवणे, तसंच खाजगी जागा विकसित करण्यासाठी आणि वसविण्यासाठी लोकांना आमंत्रित करणे, हे शेटे आणि शेटे-महाजन यांच्या कामाचं स्वरूप असे. त्यांच्या कामाचा मुख्य भाग म्हणजे स्थानिक कारागिरांच्या वस्तूंसाठी आणि आयात केलेल्या मालासाठी बाजारपेठ वसविणे. या शेटे मंडळींना कारागीर आणि व्यापारी यांच्याकडून माल किंवा नगद स्वरूपात करवसुलीचा अधिकार होता. काही पेठा निवासी पेठा होत्या तर काही पेठा मुख्यत्वेकरून बाजारपेठा होत्या, उदा., कसबा पेठ, सोमवारपेठ, सदाशिवपेठ या निवासी पेठा तर मलकापूर आणि बुधवारपेठ या बाजार पेठा. तर विसापूर ही लष्करी छावणी होती.
Friday, 17 December 2021
वाड्यांचा इतिहास
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment