Thursday, 17 December 2020

कर्करोग (Cancer) मराठी विश्वकोश माहिती

नियंत्रित पेशी-विभाजनामुळे उद्भवणारा एक रोग. या रोगामुळे शरीरातील निरोगी ऊतींचा नाश होतो आणि जीवाला धोका निर्माण होतो. शरीराच्या कोणत्याही भागात कर्करोग होऊ शकतो आणि इतर भागातही तो पसरू शकतो. कर्करोगाचे सु. १०० प्रकार माहीत झाले आहेत. मध्यमवयीन आणि प्रौढवयीन लोकांमध्ये हा रोग होण्याचे प्रमाण अधिक असते. वाढत्या वयानुसार हा रोग होण्याची शक्यता वाढते. इ.स. २००७ मध्ये जगभर मृत्युमुखी पडलेल्या एकूण लोकांपैकी सु. १३% लोक कर्करोगाने मरण पावले होते. स्त्री-पुरुषांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण जवळपास सारखेच आढळले आहे. माणसाप्रमाणे इतर प्राण्यांनाही कर्करोग होतो.

कर्करोग कसा होतो ? यासंबंधीची पुरेशी माहिती वैज्ञानिकांना उपलब्ध झाली आहे. सर्व पेशींमधील सजीवांच्या गुणसूत्रांमध्ये जनुके असतात. पेशींची वाढ आणि प्रजनन या बाबी जनुकांमार्फत होत असतात. जेव्हा या जनुकांमध्ये बिघाड होतो आणि पेशींचे विभाजन नियंत्रणाबाहेर घडून येते तेव्हा कर्करोग उद्भवतो.

कर्करोगाचा विकास, उपचार आणि प्रतिबंध यांचा अभ्यास कर्करोगशास्त्रात केला जाते. यात संशोधन आणि वैद्यकीय चिकित्सा अशा दोन्ही बाबी समाविष्ट आहेत. कर्करोगशास्त्रातील निष्णात वैद्यकांना कर्करोगशास्त्रज्ञ म्हणतात.

मनुष्याला होणार्‍या कर्करोगाचे वर्गीकरण दोन प्रकारे होऊ शकते : (१) कर्करोग प्रथम प्रकट होणार्‍या शरीराच्या भगावरून उदा., स्तनांचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग. (२) कर्करोगाची प्रथम लागण होणार्‍या ऊतीवरून, उदा., लसीका मांसार्बुद (लिंफोमा). बहुधा त्वचा, स्त्रियांची स्तने आणि पचनसंस्था, श्वसनसंस्था, प्रजननसंस्था, रुधिरनिर्माण (रक्तोत्पादक), लसीकासंस्था आणि मूत्रसंस्था अशा संस्थांच्या इंद्रियांत कर्करोग प्रथम दिसून येतो. अशा वेगवेगळ्या भागांत कर्करोग होणार्‍या रुग्णांची संख्या देशांनुसार बदलते. जपानमध्ये जठराच्या कर्करोगाचे प्रमाण अमेरिकेची संयुक्त संस्थाने (यूएसए) आणि भारत या देशांपेक्षा अधिक आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि ग्रेट ब्रिटनमधील स्त्रियांमध्ये भारत आणि इतर आशियातील देशांच्या तुलनेत स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे.

Click here more Information

https://marathivishwakosh.org/17695/ 

No comments:

Post a Comment