भावे, विनोबा : (११ सप्टेंबर १८९५–१५ नोव्हेंबर १९८२). थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. कोकणातील रायगड जिल्ह्याच्या पेण तहसिलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहरी भावे यांचा जन्म झाला. यांची जात चित्पावन ब्राह्मण. आजोबांचे नाव शंभुराव भावे. शंभुराव भावे यांचे जन्मगाव वाई (जि. सातारा). त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते. वाईच्या ब्राह्मणशाही या मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर आहे. हे भाव्यांच्या मालकीचे असून तेथे शंभुरावांनी अग्निहोत्र स्वीकारून अग्निहोत्र शाळा स्थापली होती. आजोबा आणि मातुश्रींपासून धर्मपरायणतेचे संस्कार विनोबांना मिळाले. त्यांचे वडील नरहरी शंभुराव भावे व आई रूक्मिणीबाई. हे नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. १९१६ साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले; परंतु वाटेतच सुरतेस उतरून आईवडिलांना न कळविताच वाराणसी येथे रवाना झाले. त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते. एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक. वाराणसी येथे हिंदुविश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधींचे भाषण झाले. त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. हिमालयातील अध्यात्म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधींच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्त्वात त्यांना आढळल्या. महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केला. महात्मा गांधींची कोचरब आश्रमात ७ जून १९१६ रोजी भेट घेतली आणि तेथेच त्या सत्याग्रहाश्रमात नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली. ऑक्टोबर १९१६ रोजी महात्मा गांधींची एक वर्षाची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताच्या अध्ययनाकरिता उपस्थित झाले. ब्रह्यविद्येची साधना त्यांचा जीवनोद्देश होता.
click link
No comments:
Post a Comment