Friday, 25 June 2021

शाहू, छत्रपती (कोल्हापूर) : (२६ जून १८७४– ६ मे १९२२).

शाहू, छत्रपती (कोल्हापूर) : (२६ जून १८७४– ६ मे १९२२). महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर 

छत्रपती राजर्षी शाहू महाराज
छत्रपती राजर्षी शाहू महाराज

संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१७ मार्च १८८४). राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना राज्याधिकार (२ एप्रिल १८९४) प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला (१८९१). त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या.

त्यांनी प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ. ब. लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.

कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला (१८९९). कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लो. टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला. कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहूंचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.

वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल’ ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्‌गुरू’ पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले (१९२०). धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता.

शाहूंनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला. वेदांवरील श्रद्धा व जातिभेदाला विरोध, या आर्यसमाजाच्या तत्त्वांमुळे त्यांनी स्वत:ला ‘आर्यसमाजी’ म्हणून घोषित केले तथापि त्याच्या ते आहारी गेले नाहीत. अर्यसमाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्यसमाजाकडे चालविण्यासाठी दिले गेले.

click link more information 

https://vishwakosh.marathi.gov.in/33458/ 

No comments:

Post a Comment